धाराशिव (प्रतिनिधी)-राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, धाराशिव येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करीत विजयाचा संकल्प केला. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या साक्षीने पालकमंत्री म्हणाले की, आपल्याला 2024 ची धाराशिव लोकसभा जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी विजयी करायाची आहे. शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे व भाजप नेते जो उमेदवार देतील तो उमेदवार प्रचंड मतान निवडून त्याला संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे. त्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करीत आहोत. लोकसभा निवडणूक अंतर्गत जे जे पक्षाची कामे, मतदार यादी, प्रचार यासह वॉर रूम येथे असणार आहे. डॉ. सावंत हे आता थेट जनसंपर्क कार्यालय माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भूम, परंडा, कळंब यानंतर आता धाराशिव शहरात लोकसभा जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री तानाजी सावंत यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. ते किंगमेकर व जाईट किलर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे आहे. त्यातच सावंत यांनी जनसंपर्क  कार्यालये सुरू केल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य पसरले असून, आतपासूनच कामाला सुरूवात केली आहे. अगदी काही महिन्याच्ा कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार असल्याने या निवडडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. नरेंद मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी सर्वांना आपले संपूर्ण योगदान द्यावे लागणार आहे. यासाठीच धाराशिव लोकसभा जिंकणे हे आपले इथून पुढचे लक्ष असणार आहे असे ते म्हणाले. तेव्हा सर्वांनी यासाठी कामाचे योग्य नियोजन करत जबाबदाऱ्या वाटून घेत कामाला लागायला हवे. त्याच पार्श्वभुमीवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयात लोकांनी हक्काने त्यांच्या समस्या घेवून याव्यात असे आवाहन पालकमंत्री सावंत यांनी केले. 

या प्रसंगी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, महिला जिल्हाप्रमुख भारती गायकवाड, तुळजापूर तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ, आनंद पाटील, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top