तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे आजाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर प्रा. डॉ. यशवंतराव डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. पुढे ते म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका भारत स्वतंत्र होण्यासाठी निरपेक्ष अशी होती. भारत देशात त्यावेळी सिव्हिल सर्व्हिस सेवेत देशात चौथा रँक येऊन सुध्दा त्यांनी नोकरी नाकारली. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड पाहून ते खूप विचलित झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी गांधीजींचा 'राष्ट्रपिता' म्हणून उल्लेख केला. त्यांना एकच ध्यास होता परकीय गुंतवणूकदार हाच परकीय शत्रू झाला आणि त्यांच्यापासून देश स्वतंत्र झाला पाहिजे. 'जय हिंद' व 'तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दुंगा!' हे दोन ब्रीद त्याकाळी तरुणांना ऊर्जा प्रदान करत होते. तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी त्यांच्या अस्तित्वाची राखण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, आणि प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा व भाषेचा मान राखणे यात वावगे ते काय असा सवाल ही ते नेहमी करत. जाति पातिच्या भिंती गाडून मराठी माणसाने एकजूट व्हावे हीच त्यांची इच्छा होती.  नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना हा विचार त्यांनी तरुणांना दिला. खऱ्या अर्थाने म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची लढाई ही अस्तित्वाचीच होती हे यावरुन सिद्ध होते. त्यांचे विचार अंगीकारणे हे आज काळाची गरज आहे असे सूतोवाच डॉ. डोके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंत्री आर. आडे यांनी केले. तर आभार प्रा. एम. जे. वसावे यांनी केले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक सुमेर कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top