धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे पोलिसांनी एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले असून, ड्रग्जसह ब्रिझा कार असा एकूण 4 लाख 26 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. तरूणाकडे 8.33 ग्रॅम ड्रग्ज सापडले असून, त्यात मोठ्या रॅकेटचा पोलिसांना संशय आहे.

जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर, धाराशिव, उमरगा यासह अन्य भागात एमडी ड्रग्ज उघडपणे मिळत असल्याची चर्चा होती. पोलिस गुप्त माहितीच्या आधारे शहर व परिसरात दि. 19 जानेवारी रोजी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्याला पकडण्यासाठी गस्त घालत होते. एका दक्ष नागरिकाने त्यांना एक तरूण परंडा ते देवगावरोड खंडेश्वरी शाळेसमोर ब्रिझा कार क्र. एम. एच. 46 ए. यु. 2832 बाजूला लावून एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती दिली. परंडा पोलिसांच्या पथकाला परंडा ते देवगाव मार्गावर कॅनलच्या बाजुला एक तरूण ब्रिझा कारमध्ये बसलेला आढळला. त्याचे नाव इम्रान नशीर शेख आहे. त्याची झाडाझडती घेतल्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाचे पावडर आढळले. विचारणा केल्यावर त्याने ते एमडी ड्रग्ज असल्याचे पंचांच्या समक्ष सांगितले. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जचे वजन 8.33 ग्रॅम भरले असून, त्यांची किंमत 16 हजार रूपये आहे. 4 लाख रूपयाची कार व 16 हजारांचे ड्रग्ज, मोबाईल असा एकूण 4 लाख 26 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 कलम- 8 (क), 22 (ब) अन्वये उमरगा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, योगेश यादव, रफीक मुलानी, बळीराम शिंदे आदींच्या पथकाने केली.


 
Top