धाराशिव (प्रतिनिधी)-राज्यात महायुतीचे सरकार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी या सरकारने भरीव असा निधी दिला. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते  व नेते यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा समन्वय समिती नियुक्त केली आहे अशी माहिती भाजपाचे आमदार राणजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

12 जानेवारी रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिंदे गटाचे सुरज साळुंके, माजी सभापती दत्ता साळुंखे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रहार संघटनेचे मयुर काकडे, अजित पवार गटाचे महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा म्हणून येत्या 14 जानेवारीला जिल्हा मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रमाणेच तालुका व गावपातळीवर पण असे मेळावे घेण्यात येतील. महायुती समन्वय समितीमध्ये दत्ता साळुंके, नितीन काळे, सुरेश बिराजदार, मयुर काकडे, राजाभाऊ ओव्हाळ, सुरज साळुंके आदींचा समावेश आहे. समिती दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचेही सांगितले. 

महायुतीचा उमेदवार महिना अखेर जाहीर होणार 

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार ठरविण्यासाठी सर्व्हे चालू आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा उमेदवार जाहीर होईल असे आमदार पाटील यांनी सांगितले. तर आमदार चौगुले यांनी लोकसभा निवडणुकीसह पुढील सर्व निवडणुका महायुती एकत्र लढविणार आहे असे सांगितले. धाराशिव जिल्ह्याला महायुतीच्या काळात टेक्सटाईल पॉर्क, कृष्णा खोऱ्यातील पाणी जलगतीने आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम आचार संहितेपूर्वी चालू होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. 



 
Top