उमरगा (प्रतिनिधी)-शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक, सांप्रदायिक कार्यक्रमाची सांगता गुरुवारी (ता.25) झाली. 

येथील महादेव पंच कमिटी, महादेव भजनी मंडळाने अध्यात्माचे चिरंतन ज्ञानार्जन होण्यासाठी गेल्या 49 वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी पहाटे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते श्री माऊली अधिष्ठान पुजन झाले. ज्ञानेश्वरी व्यासपिठ अधिकारी म्हणुन विश्वनाथ गर्जे, मनोहर महाराज माने, तुकाराम गाथा व्यासपिठ अधिकारी म्हणुन बब्रुवान सुर्यवंशी (मास्तर) यांनी काम पाहिले. दरम्यान सप्ताहात दिपक महाराज जाधव, हरि गुरुजी लवटे, विश्वनाथ महाराज गर्जे, भिम महाराज सुरवसे, डॉ. अनिकेत इनामदार, महेश महाराज माकणीकर यांचे प्रवचन झाले. सप्ताहात ज्ञानेश्वरी व गाथा पारायणासाठी असंख्य तरुण, तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बुधवारी (ता. 24) रात्री सोपन महाराज सानप (हिंगोली) यांची किर्तन सेवा झाली.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता महादेव मंदिरापासुन प्रमुख मार्गावरून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. दुपारी शरदचंद्र महाराज बिराजदार यांचे काल्याचे किर्तन झाले. या वेळी उपअभियंता देवीदास दाडगे, महावीर कोराळे, सचिन शिंदे, महादेव भजनी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष महादेव शिंदे, बलभिम शिंदे, महादेव पंचकमेटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे, बाबुराव सुरवसे, बळीराम कोराळे, दिलीप इंगळे, चंद्रकांत मजगे, राजु दामशेट्टी, करबस शिरगुरे, राम पौळ, बाबा साळूंके, नितीन सुरवसे, राजेंद्र सुर्यवंशी, किशोर शिंदे, शिवशंकर पाटील, विमल सुरवसे यांच्यासह महादेव भजनी मंडळ, सार्वजनिक महादेव गणेश मंडळ, ब्रम्हदेव गणेश मंडळ व विविध भजनी मंडळांच्य सदस्यांनी सप्ताहाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. गिरीश सुर्यवंशी यांच्यासह अनेक अन्नदात्यांनी महाप्रसादाची सोय केली होती.


 
Top