धाराशिव (प्रतिनिधी)-स्वातंत्र्य संग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्यावतीने मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार व स्वातंत्र्यसेनानी भानुदासराव धुरगुडे साहित्य रत्न पुरस्कार दिले जातात. यावर्षी 2023 सालातील सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून पंडित कांबळे यांनी संपादित केलेल्या “दत्तांकुर यांच्या निवडक कविता“या कविता संग्रहाला  स्वातंत्र्यसेनानी भानुदासराव धुरगुडे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो दि. 01 जानेवारी 2024 रोजी पंचायत समिती कार्यालयाजवळ, तुळजापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, पुस्तके व रोख रक्कम देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा विमलताई धुरगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, मराठवाडा समन्वय समिती, पुणे चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, भानुदासराव धुरगुडे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र धुरगुडे,लेखक  व सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर सावंत हे यावेळी उपस्थित होते.

पंडित कांबळे यांनी धारवाड विद्यापीठातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाबुराव गायकवाड हे दत्तांकुर या नावाने कविता लेखन करतात त्यांच्या नऊ कवितासंग्रहातील निवडक कविताचे संपादन “दत्तांकुराच्या निवडक कविता“ या नावाने केले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल जयराज खुने, योगीराज वाघमारे, डॉक्टर अरविंद हंगरगेकर, डॉक्टर रूपेश कुमार जावळे, रामजी कांबळे, व्ही.एस. गायकवाड, राजेंद्र धावारे यांनी अभिनंदन केले आहे. पंडित कांबळे हे धाराशिव येथील नगर परिषद शाळा क्रमांक 14 येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे कवितासंग्रह,बालकविता संग्रह, संपादित पुस्तके, समीक्षा ग्रंथ अशी विविध प्रकारची 11 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व साहित्यिक मित्र, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.   


 
Top