धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रीय युवक कल्याण, क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनाच्यावतीने नाशिक येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात धाराशिवच्या ‌‘पांडूरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पंढरपूरची दिंडी' या लोकनृत्यातून सादर झाली. विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारी धाराशिवकरांची वारी देशात भारी ठरली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या लोकनृत्याने महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवात समूह आणि व्यक्तिगत स्वरूपातील लोकनृत्य, लोकगीत, घोषवाक्य सादरीकरण, कथालेखन, पोस्टर मेकिंग आणि छायाचित्र, अशा कलाप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. या महोत्सवात देशातील 31 राज्यांतील सात हजार पाचशेहून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. यावेळी लोकनृत्य सामूहिक या कलाप्रकारात अखिल भारतीय मराठी नाट्य शाखा धाराशिवने प्रथम क्रमांक तर केरळ द्वितीय आणि पंजाबच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, केंद्रीय कल्याण विभागाच्या संचालक वनीता सूद, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक आणि एक लाख 50 हजारांचे रोख पारितोषिक देवून धाराशिवच्या संघाला गौरविण्यात आले.

या संघामध्ये अंबिका आगळे, अंकिता माने, दिशा सोनटक्के, वैष्णवी नागटिळक, उत्कर्षा शिंगाडे, अश्विनी मेटे, विजय उंबरे, ऋषिकेश गवळी, सुमित चिलवंत, प्रसेनजित शिंगाडे, दिग्विजय शिंगाडे, सुजित माने, रमन भोईभार, संकेत नागणे, सागर चव्हाण, शरणम शिंगाडे, प्रियंका पोतदार, सुभाष सोनवणे, विश्वनाथ काळे, अक्षय दिवटे, किशोर कसबे, सुमित शिंगाडे, यशवंत शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, सतीश ओव्हाळ, मंगल ओव्हाळ व विशाल शिंगाडे यांचा सहभाग होता. या लोकनृत्याचे नृत्य दिग्दर्शन विशाल टोले, लक्ष्मी रूपनूर यांनी केले. तर गायन सुजित माने, अश्विनी माने तर मृदंगवादक रमन भोईभार यांनी मृदंग साथ दिली.


 
Top