नळदुर्ग (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या गलथान व भोंगळ कारभारामुळे नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता अतीशय खराब झाला असुन यात्रेपुर्वी ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी संतप्त भाविकांनी केली आहे.

नळदुर्ग (मैलारपुर) येथे दि.24, 25 व 26 जानेवारी 2024 रोजी श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. ही यात्रा एक आठवडा चालते. या यात्रेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील लाखो भाविक श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी येतात. 25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असुन यादिवशी याठिकाणी तब्बल 5 ते 6 लाख भाविक उपस्थित असतात. यात्रा अगदी तोंडावर आलेली आहे. मात्र खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी अतीशय धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून खाली उतरून मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो अतीशय खराब झाला आहे. हा रस्ता पुर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मंदिराकडे जाताना हा रस्ता उतार आहे त्यामुळे आताच या रस्त्यावरुन पायी  चालत जाणारे भाविक पाय घसरुन पडत आहेत.वाहन चालकांना तर या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुची अवस्था अशीच आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक ज्यावेळी नळदुर्गकडे जातो तो रस्ताही अतीशय खराब झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याची पाहणी करून यात्रेत या खराब रस्त्यामुळे कुठली दुर्घटना घडू नये यासाठी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेले हे अधिकारी अतीशय निष्क्रिय झाले आहेत. आज महामार्गाचे काम अतीशय संथ गतीने चालत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने तसेच प्रत्येक भाविक हा याठिकाणी आपले वाहन घेऊन येतो त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे. आज या खराब झालेल्या रस्त्यावरुन जाणारे दुचाकी वाहने अपघातग्रस्त होत आहेत. त्यामुळे केवळ या खराब रस्त्यामुळे अपघात होऊन कुणाचा तरी जीव जाण्याअगोदर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी नळदुर्ग (मैलारपुर) येथे भरणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या यात्रेचे महत्व लक्षात घेऊन तसेच यात्रेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून घ्यावा याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला आदेश करणे गरजेचे आहे.


 
Top