धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासोबतच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.यंत्रणांनी दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. यावेळी या बैठकीत सत्ताधारी व विरोधक एकत्र बसले असले तरी बैठक खेळीमेळीत संपन्न झाली.

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी व जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने ट्रांसफार्मर बँक तयार करावी. जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दोन लिफ्टची उभारणी करण्यात यावी. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जेनेरिक मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यात यावे.430 कोटी रुपयांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी इमारत उभी राहणार आहे. त्याचे डिझाईन कोणी तयार केले आणि त्यासाठी कोण सल्लागार नियुक्त केला आहे. याची माहिती महाविद्यालयाच्या अधिष्ठाताने जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करून द्यावी.शहरी भागाच्या विकासासाठी नगरपालिकांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येतो.जिल्ह्यातील नगरपालिकांनी विविध कामावर निधी खर्च कमी केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तातडीने निधी खर्च करावा,असेही प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले. 

यावेळी खासदार राजेनिंबाळकर यांनी शहरातील भुमिगत गटारची कामे मार्चपूर्वी पुर्ण करा. त्याप्रमाणे जिल्हा रूग्णालयासाठी एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली. तर आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव नगरपालिका क्षेत्रात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पोलीस विभागाने सीसीटीव्ही लावण्याचे काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बँकांनी ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केले आहे ते काढून टाकण्यात यावे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.


 
Top