भूम (प्रतिनिधी) -कै. वस्ताद सोमा अण्णा पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कुस्ती संकुलाचे राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या सोहळ्याचे तसेच भूम शहराचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कुस्ती संकुलात 21 लाखांची बक्षिसे ठेवत कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले होते. 100 रु ते 5 लाख रुपयांच्या कुस्त्यांचा फड यावेळी भरविण्यात आला होता. कुस्त्यांचे प्रमुख आकर्षण होता 2023 चा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी भोला पंजाबी, सोबतच या वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुवर्णपदक विजेता आगळगावचा मनोज माने. या प्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.
यावेळी पै. मनोज माने विरुद्ध पुण्याचा पै. ऋषिकेश आरकिले यांची कुस्ती झालीफ या कुस्तीत पै. मनोज माने याने एकेरी पट घालत ऋषिकेश यास जमिनीवर लोळवत 2 लाखांची कुस्ती अवघ्या 2 मिनिटात आपल्या नावावर केली. यानंतर 3 लाखांची कुस्ती व 2 किलोची चांदीच्या गदेसाठी तसेच महाराष्ट्र चॅम्पियन कै.पै.हादी सय्यद यांच्या स्मरणार्थ अलंमप्रभू केसरी या किताबासाठी दादामिया मुलाणी व अण्णा बिरमाणे यांच्यात कुस्ती घेण्यात आली. विरोधी पैलवानाला दादामिया मुलाणी याने अस्मान दाखवले. विहाळच्या पै. अनिल जाधव ने खवासपूरच्या पै.बंटी कुमारला 1.5 लाखांच्या कुस्तीत यात डोळ्याची पापणी लवण्याच्या आत कुस्ती करत चितपट केले. सर्वांच्या नजरा या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी भोला पंजाबी यांच्या कुस्तीवर वळल्या. यावेळी शेवटची कुस्ती लावण्यासाठी मैदानात धाराशिव जि.प.चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, साहिल गाढवे, 2005 चे महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, कुस्ती सम्राट अस्लम काझी, वस्ताद हुसेन भाई, मामु जमादार आदी उपस्थित होते. सुरवातीचा काही काळ पंजाब केसरी भोला पंजाबी सिकंदर वर वरचढ ठरत होता. यावेळी प्रेक्षक धीरगंभीर होत कुस्ती पाहत होते. सिकंदरने त्याच्या त्वेषाचा धीराने सामना करत त्याला थकवून अचानक कुस्तीवर ताबा मिळवला व क्षणार्धात त्याने भोलावर कात्री डावाने पकड मिळवत मानेवर कोपऱ्याने रगडत भार देऊन घायाळ करत पाठीवर पाडत चितपट केले. कुस्ती झाली व एकच जल्लोष मैदानात पाहायला मिळाला. यावेळी 1 लाखाच्या 5, 51 हजाराच्या 5 तर 31, 25, 21, 15, 11 अश्या एकूण 21 लाख रुपये बक्षीसाच्या कुस्त्या पहिल्यांदाच भूम येथे पार पडल्या. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यातर्फे 5 लाखांचे बक्षीस सिकंदर शेख यास देण्यात आले. कुस्त्यांसाठी वस्ताद मामु जमादार, पै.धनंजय गाढवे, पै.अण्णा पवार, पै.चांद भाई सय्यद, पै.आदिल चाऊस, पै.सचीन साबळे, पै.फैसल पठाण, पै. विकास तांबे, पै.सोमनाथ मोरे, पै.अमोल भोसले यांच्यासह साहिल अप्पा गाढवे मित्रमंडळ व मौलाली तालीम संघ भूम यांनी विशेष परिश्रम घेतले.