धाराशिव (प्रतिनिधी)-खास मकरसंक्रांति निमित्त तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंगेश फाकटकर आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमांने  रंगत आणली. महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तेर आणि परिसरातील महिलांनी गर्दी केली होती. यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमांतर्गत खास महिलांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ  घेण्यात आले.

उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात पैठणीच्या मुख्य विजेत्या ठरल्या दिपाली ढगे. त्यांना मानाची पैठणी सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी उपविजेता ठरल्या पुष्पा झिंजे ,सविता धोंगडे आणि प्रमिला आगलावे. या तिघीनाही मानाची पैठणी देण्यात आली. तर उत्तेजनार्थ बक्षीस सुचिता साळुंखे, अनुजा भुरे,अर्चना घोडके यांना देण्यात आले. यांना बक्षीस म्हणून मूर्ती देण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांसाठी आयोजित केलेल्या लक्की ड्रॉमध्ये सर्व महिलांना सहभागी होता आले व त्यामधूनही एक महिलेला पैठणी देण्यात आली. प्रत्येकीच्या मनामध्ये उत्सुकता असलेली ही पैठणी प्रियांका राऊत यांनी पटकावली .उपविजेत्या व उत्तेजनार्थ विजेत्यांनाही सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पैठणी आणि बक्षीस देण्यात आले. तीन तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मनमुराद आनंद लुटला.

यावेळी मार्गदर्शन करताना सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, मकर संक्रांतीनिमित्त आपण सर्व महिला एकत्र येतो, या निमित्त जिल्हाभरात कार्यक्रम होत असले तरीही मला तेर मध्ये या कार्यक्रमामुळे विशेष आनंद मिळतो. मी प्रत्येक वर्षीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेते. त्याच बरोबर अनेक कार्यक्रम घेते, यामुळे महिलांना एकत्र  येता येते. एकमेकींच्या मनातील भावनांची देवाण-घेवाण होते. यावेळी त्यांनी महिलांसाठी असलेल्या अनेक शासकीय योजना  सांगितल्या. व  यासाठी प्रत्येकीनी प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले. आपला उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशीही त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

पैठणी विजेत्या सर्व महिलांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत केवळ सौ अर्चनाताई यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आम्हाला आनंद घेता येतो. तसेच आमच्या मनातील भावना पोहोचवता येतात अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला. तर याच कार्यक्रमात उपस्थित एका जेष्ठ महिलेने आपण विधवा असूनही या कार्यक्रमाचा आनंद घेतला असल्याचे खास आपल्या बोलण्यातून नमूद केले. आणि यासाठी त्यांनी अर्चनाताई पाटील यांचे विशेष आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वच महिलांना वाण म्हणून श्रीरामाची मूर्ती आणि तुळजाभवानीचे कॅलेंडर भेट म्हणून देण्यात आले.


 
Top