उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा शहरातील ग्रामदैवत महादेव मंदिरात होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी पारायण व गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 19 जानेवारीपासुन विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  गुरुवर्य धोंडोपंत दादा साहेब, गुरुवर्य दासराव इनामदार गुरूजीच्या कृपाशीर्वादाने होणाऱ्या सप्ताहानिमित्ताने शुक्रवार (ता.19) पासून गुरूवारपर्यंत (ता.25) पर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण व गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शुक्रवारी पहाटे चार वाजता श्री माऊली अधिष्ठान पुजन श्री.व सौ. अमोल मोरे यांच्या हस्ते होणार असून ज्ञानेश्वरी व्यासपीठ अधिकारी विश्वनाथ महाराज गर्जे, मनोहर महाराज माने रहाणार आहेत तर संत तुकाराम गाथा व्यासपीठ अधिकारी बब्रूवान  सूर्यवंशी असणार आहेत. दररोज पहाटे चार ते सात ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी नऊ ते अकरा गाथा भजन, दुपारी चार ते पाच प्रवचन, पाच ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन, त्यानंतर हरिजागर व पहाटे दोन ते चार काकडा आरती होणार आहे. शुक्रवारी दीपक महाराज जाधव यांचे प्रवचन व कृष्णा महाराज राऊत यांचे कीर्तन होईल. शनिवारी (ता.20) चार वाजता हरि गुरुजी लवटे यांचे प्रवचन व रात्री ॲड शंकर महाराज यांचे कीर्तन, रविवारी (ता. 21) चार वाजता विश्वनाथ महाराज गर्जे यांचे प्रवचन व रात्री ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन, सोमवारी (ता. 22) चार वाजता  भीम महाराज सुरवसे यांचे प्रवचन व रात्री नितीन महाराज (कवळी) यांचे कीर्तन, मंगळवारी (ता. 23) चार वाजता डॉ अनिकेत इनामदार यांचे प्रवचन व रात्री निलेश महाराज कोरडे यांचे कीर्तन. बुधवारी (ता.24) चार वाजता महेश महाराज माकणीकर यांचे प्रवचन व रात्री सोपान महाराज सानप यांचे कीर्तनसेवा होणार आहे. गुरूवारी (ता. 25) दुपारी अकरा वाजता शरदचंद्र महाराज बिराजदार यांचे काल्याचे कीर्तन होईल. महिला हरिपाठ भक्ती साधना मंडळ, प्रासादिक मंडळ, मुक्ताई मंडळ, साई मंडळ, अहिल्यादेवी होळकर मंडळ, ओमकार, गुरूकृपा मंडळ, महादेव महिला भजनी, शिवपुरी महिला भजनी मंडळ या सोहळ्यात सहभागी रहाणार आहेत. या सप्ताह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन महादेव पंच कमिटी, श्री. महादेव भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.


 
Top