धाराशिव (प्रतिनिधी) - शासनाने समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत अनेक योजनांचा समावेश केला आहे. मात्र त्या योजनांची माहिती पारधी बांधवांना नसल्यामुळे ते या योजना पासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये त्यांना आधार कार्ड मतदान कार्ड सह इतर आवश्यक असलेली सर्व प्रकारची प्रमाणपत्रे वितरित केली व करण्यात येणार आहेत. त्या प्रमाणपत्राच्या आधारे पारधी बांधवांनी आदिवासी विभागासह इतर सर्व विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे महसूल व वन विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वाशीचे तहसिलदार नरसिंग जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्क निरीक्षक अतुल पाटील, आदिवासी विकास निरीक्षक व्ही.वाय. सरतापे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, गट विकास अधिकारी संतोष नलावडे, गट शिक्षण अधिकारी भारत बन, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप, सरपंच दिलीप घोलप, ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे, गंगाराम शिंदे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


नोकरीसह व्यवसाय करुन आत्मनिर्भर व्हावे - अतुल कुलकर्णी 

पारधी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने खास त्यांच्यासाठी...पहाट... हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पारधी बांधवांचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मतदान कार्ड, शिधा पत्रिका, आयुष्यमान भारत योजना कार्ड व इतर प्रमाणपत्राचे वाट करून त्यांच्या रहिवासी ठिकाणासह इतर सर्व माहितीची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. तर पारधी समाजातील 10 वी व 12 वीपर्यंत शिकलेल्या युवक - युवतींना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पारधी बांधवांनी यापुढे कुठलाही अवैध धंदा न करता किंवा त्यामध्ये सहभागी न होता नोकरी, व्यवसाय व शेती करून सर्व सामान्यासारखे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.


 
Top