धाराशिव (प्रतिनिधी)-कला आणि क्रीडा आनंदी आणि उत्साही जीवन जगण्याचे स्रोत आहेत. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. क्रीडा व कला स्पर्धा निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
4 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023- 24 च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधकारी महेंद्रकुमार कांबळे, उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महसूल तहसीलदार प्रवीण पांडे,भुमचे तहसीलदार सचिन खाडे, तहसीलदार वाशी नरसिंह जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताणतणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने क्रीडा आणि कला कौशल्य आत्मसात करून दैनंदिन जीवन आनंद आणि उत्साहाने जगावे. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या व पारितोषिक प्राप्त खेळाडू तसेच सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
29 व 30 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हास्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा मोठया उत्साहात आयोजित करण्यात आली. या स्पर्धांमध्ये महसूल विभागाच्या जिल्हयातील सर्व महिला व पुरूष कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. क्रीडा स्पर्धामध्ये धावणे, गोळा फेक, लांब उडी, रिले रेस, टेबल टेनिस,थाळी फेक, क्रिकेट,बुध्दीबळ, कॅरम,बॅडमिटन,रिंग टेनिस आदी खेळामध्ये खेळाडूनी चमकदार कामगिरी केली. सांस्कृतिक स्पर्धोमध्ये समूहनृत्य वैयक्तिक नृत्य फिल्मी गित,भक्ती गीत,रॅम्प वॉक, एकपात्री नाटक,स्टॅडअप कॉमेडी व अभिनय या प्रकारात सहभागी स्पर्धाकांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.