तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवराञ उत्सवाची सांगता गुरुवारी दि. 25 जानेवारी रोजी दुपारी घटोत्थापनाने सांगता झाला.
गुरुवारी सकाळी देविजीस दहीदुधपंचामृतअभिषेक घालण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालुन देविजींची धुपारती करण्यात आली. नंतर अंगारा काढण्यात आला. घटाला माळ घालुन दुपारी 12 वाजता शतचंडी होमास कोहळा नारळाची पूर्णाहुती दिल्यानंतर घटोत्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता झाला. यावेळी मुख्य यजमान अनुराधा व विनोद सुनील सोंजी- पाळीचे भोपेपुजारी सुनिल सोंजी, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, प्रशासकीय अधिकारी सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले सह भोपे पुजारी, सेवेकरी, भाविक, मंदीर कर्मचारी उपस्थितीत होते. श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकभरी पोर्णिमाच्या राञी हत्ती वाहनावर छबिना काढण्यात आला. नंतर श्रीतुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी आपल्या उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शांकभरी नवराञ उत्सवाचा सांगता झाला. तर शांकभरी नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर महाप्रसाद वाटप करण्यात आले.