धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधवानी धाराशिव ते तुळजापूर अशी महावाहन रॅली काढत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी  चरणी आरती करून साकडे घातले. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी फोनवरून संवाद साधला. 

या रॅलीत दुचाकी, चारचाकी गाड्यासह एक मराठा, कोट मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मराठा बांधव सहभागी झाले. तुळजापूर शहरात प्रवेश करताच तुळजापूर येथील बांधवांनी त्यांचे स्वागत केले. मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व समाज बांधवाचे आंदोलन यशस्वी व्हावेक यासाठी तुळजाभवानी देवीला साकडे घातले. 

धाराशिव शहरातील छत्रपती शाहु महाराज चौक तेरणा कॉलेज येथून रॅलीस सुरूवात झाली. नंतर महात्मा बसवेश्वर चौक, राजमाता जिजाऊ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टॅन्ड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे मार्गक्रमण करीत रॅली श्री तुळजाभवानी मंदिर येथे गेली. तिथे देवीची आरती केली. रॅलीत महिला, पदाधिकारी व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top