धाराशिव (प्रतिनिधी)-क्रीडा मंत्रालयाच्या भारतीय खेल प्राधिकरणअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता महिला राज्यस्तरीय किकबॉक्सिंग लीग स्पर्धेत धाराशिव येथील सफल रवींद्र केसकर हिने सुवर्णपदक पटकावले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या परिसरात या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्यावतीने 13 आणि 14 जानेवारी रोजी राज्यस्तरीय वुमेन्स अस्मिता खेलो इंडिया किकबॉक्सिंग लीग स्पर्धा पार पडली. 36 मराठा रेजिमेंटचे कर्नल पियुष मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिलेश, सचिव धीरज वाघमारे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत राज्यभरातून 350 खेळाडू सहभागी झाले होते. 55 किलो वजनी गटात सफल रवींद्र केसकर हिने सलग तीन फाईट जिंकून स्पर्धेतील सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक पटकावून धाराशिवचा क्रीडा क्षेत्रात नावलौकीक केला आहे. सफलने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. तिला शरीफ शेख, वासिम सय्यद, ओंकार झाल्टे, सुरजीत पंचमहाल यांचे मार्गदर्शन लाभले. राज्य शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय किकबॉक्सिंग स्पर्धेतही 14 वर्षे वयोगटात सफल केसकर राज्यस्तरीय पातळीवर पात्र ठरली आहे.


 
Top