उमरगा (प्रतिनिधी)-स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रासमोरील सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन चोरट्यांनी गॅसकटरने मशीन फोडली. त्यानंतर आतील आठ लाख रुपयाची रोकड लांबवली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) पहाटे उमरगा तालुक्यातील बलसूर येथे घडली.

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील मुख्य रस्त्यालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे सोमवारी मध्यरात्री अंदाजे 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी चारचाकी गाडी एटीएम च्या समोर लाऊन एटीएम समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारला. त्यानंतर मशीन असलेल्या रुममध्ये प्रवेश केला.आजुबाजुला कोणीही नसल्याची खात्री करत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन मधील कॅश वॉल्ट कट केले व आतील आठ लाख रुपये रोकड लांबवली. ही धक्कादायक घटना उमरगा पोलीसांना समजल्या नंतर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोनि डी. बी. पारेकर ,सपोनि नवनाथ गायकवाड, पोहे व्ही.के.मुंडे, वाल्मिक कोळी हे पथकासह घटनास्थळी दखल झाले. परिसरात पाहणी करुन पंचनामा केला त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटिव्ही फुटेजचीही पाहणी केली. एटीएम फोडीची घटना समजल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाची पाहनी केली.


तीन महिन्यापुर्वी हेच एटीएम चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेर्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून 26 लाख 88 हजाराची रोकड लांब विली होती त्या घटनेचा तपास लागण्या पुर्वी त्याच पध्दतीने पुन्हा एटीएम फोडले आहे.


 
Top