धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज दि. 23 जानेवारी 24 रोजी “मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण “ अनुषंगाने धाराशिव शहरासह ग्रामीण परिसराताल भेट दिली. मराठा आरक्षणासंदर्भात हे सर्वेक्षण चालू झाले आहे. याचा अहवाल 31 जानेवारी 2024 पर्यंत सरकारला सादर करणे अपेक्षित आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, धाराशिवचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, महसूल तहसीलदार प्रवीण पांडे, मुख्याधिकारी वसुधा फड, परीवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सकाळी धाराशिव शहरातील तांबरी भागात काही घराला भेटी दिल्या. सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित चालू आहे का नाही ते पाहिले. त्यानंतर मौजे सांजा येथे दुपारी भेट दिली आणि सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी राज्य मागास आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षणाचे काम चालू असून, मराठा कुटुंबाला एकूण 182 प्रश्न यात विचारण्यात आले आहेत. कुटुबाची माहिती, उत्पन्नाचे साधने, सरकारी नोकरीला किती जण आहेत, सामाजिक चाली, रिती, परंपरा, आर्थिक व सामाजिक मागासलेपण आदी माहिती याबाबत विचारली जात आहे व ते सर्व ऑनलाईन माहिती भरली जात आहे. एका कुटुंबासाठी 30 मिनिटे लागत असल्याचेही डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. 


 
Top