धाराशिव (प्रतिनिधी) - उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेली अनियमितता, अफरातफर व फसवणुक केली जात आहे. विशेष म्हणजे खेळाडूंची निवड प्रक्रिया जिल्ह्यात न घेता जिल्हा बाहेर घेऊन जिल्ह्यातील खेळाडू न घेता बाहेरचे खेळाडू घेतले जातात. परिणामी जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती इंद्रजित देवकते यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी 2008 साली करण्यात आली आहे. तर 2011 ते 2018 दरम्यान कोणतीही निवडणूक घेतली नाही. तसेच लेखा अहवाल सादर केला नाही. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्तांनी 2018 साली ती नोंदणी रद्द केलेली आहे. मात्र जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक व दत्ता बंडगर हे सदरील प्रमाणपत्राचा गैरवापर करुन खेळाडूंची क्रिकेट असोसिएशन 19 व 14 वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी घेत आहेत. तसेच क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचा सहभाग असणे गरजेचे आहे. मात्र खेळाडू ऐवजी इतर व्यक्तींची संख्या यामध्ये अधिक होती. विशेष म्हणजे यामधील अनेकजण मयत झालेले असून अनेकांचा पत्ता एकाच ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे या प्रकरणी देवकते यांनी सहधर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी व निवेदने दिली. परंतू कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे देवकते यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचे गांभीर्य ओळखून याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी दि.24 मे रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान काय होणार ? याकडे जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.


 
Top