धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीस राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली असून ही योजना पुन:कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे 5 टप्पे असून यामुळे 6890 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातील 5700 क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे. सदरील योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष दुरस्तीचा रु. 98.14 कोटी चा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक ससल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता. सदरील समितीच्या काल दि. 11/01/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये यास मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

योजना कार्यान्वित करण्यासाठी योजेनची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाच्या दुरुस्तीचे अंदाज पत्रक आवश्यक होते. या योजनेच्या स्थापत्य दुरुस्ती साठी रु. 35.61 कोटी, विद्युत दुरुस्ती साठी रु. 18.06 कोटी व यांत्रिकी विभागाच्या दुरुस्ती साठी रु. 44.47 कोटी अशा एकूण रु 98.14 कोटीची आवश्यकता आहे. त्यामुळे अंदाजपत्रके व त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया बरीच क्लिष्ट असल्याने वेळ लागत होता. मात्र सातत्याच्या पाठपुराव्याने सर्व त्रुटी व आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला होता. कालच्या बैठकीमध्ये यास मान्यता देखील प्राप्त झाली आहे. आता निधी मागणीसाठी सदरील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडून पुढील आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाची मंजूरी लवकरात लवकर मिळवून घेण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून अनेक दिवसापासून बंद असलेली ही योजना आता लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यात आहे.


 
Top