धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव हा इतर आकांक्षित जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली प्रगती करीत आहे,सुरुवातीला 2018 मध्ये देशातील 112 जिल्ह्यांना आकांक्षित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी या जिल्ह्याचा 64 वा क्रमांक होता. आज धाराशिव 8 व्या क्रमांक आहे.ही बाब निश्चितच समाधानाची आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी 1 जानेवारी रोजी तुळजापूर येथे जिल्ह्याचा आढावा घेतांना केले.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिष हरिदास,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निती आयोगाने धाराशिव हा आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. आकांक्षित जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या निकषानुसार सुरू असलेल्या कृषी, जलसंधारण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास यासह बँकिंग क्षेत्राचा आढावा डॉ.पवार यांनी घेतला. देशातील 112 आकांक्षित जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा चौथा क्रमांक,आरोग्य क्षेत्रात 11वा तसेच कृषी क्षेत्रात 10वा क्रमांक आहे. एकंदरीत 8वा क्रमांक असणे हे समाधानकारक असले तरी कौशल्य विकास आणि इतर पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अधिक प्रयत्ने करण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी करोनाच्या नवीन व्हेरिएंट जेएन 1 ला घाबरण्याची गरज नसल्याचे डॉ. श्रीमती पवार यांनी सांगितले. करोनाचा दुसऱ्या लाटेत भारताने जगात सर्वाधिक लसीकरण केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची दाखल घेतली आहे. सध्या राज्यात याचा प्रादुर्भाव जास्त नाही, परंतू काळजी घेण्याचा सल्लाही डॉ.पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कृषी सन्मान योजनेत 2 लाख 27 हजार शेतक-यांना लाभ देण्यात आल्याचे सांगितले. पिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत शासनाकडून 218 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी डॉ.ओम्बासे यांनी दिली.