धाराशिव (प्रतिनिधी)-शेती, सहकार, अर्थकारण, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण याचा यशस्वी ताळमेळ साधून शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य नागरिक, लहान-मोठे व्यावसायिक यांच्या जीवनात धवलक्रांती आणि हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.व्यंकटराव विश्वनाथराव गुंड पाडोळीकर हे धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकांचा आधारवड बनले आहेत. एक प्रथितयश वकील ते यशस्वी उद्योजक असा त्यांचा प्रवास निश्चित आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. आज दि. 5 जानेवारी रोजी ॲड. व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या यशाचा आलेख खास वाचकांसाठी थोडक्यात देत आहोत.
रुपामाता नॅचरल शुगर, रुपामाता मिल्क, रुपामाता मल्टीस्टेट, रुपामाता अर्बन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल, संत ज्ञानेश्वर विद्यालय, इरा इन्टरनॅशनल इंग्लिश स्कुल अशा विविध संस्थांची उभारणी करुन शेकडो तरुणांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जीवनातही या उद्योगामुळे अमूलाग्र बदल झाला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले ॲड. व्यंकटराव गुंड दहावीला पास झाल्यानंतर सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. त्याची जडणघडण ग्रामीण भागात झाल्यामुळे महाविद्यालय जीवनासाठी शहरात आल्यावर सुध्दा त्यांनी न लाजता न भिता आपले शिक्षण सुरू केले. अभ्यासूव शिस्तप्रिय व्यक्तीमत्वामुळे सुप्रसिध्द वकील म्हणून ते उदयास आले. ॲड. गुंड यांच्या मनात सतत एक खंत कायम असायची दुष्काळामध्ये आपल्या परिसरातील अनेक लोक पुणे-मुंबई या ठिकाणी कामासाठी जातात. त्यामुळे त्यांनी परिसरातच शाळा, कॉलेज, दुध डेअरी, साखर कारखाना बँक आदी सुरू केले. मराठवाड्यातील सर्वांत मोठे गोडाऊन उभारण्याचे कामही त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांनी उभारलेल्या रूपामाता अर्बन व मल्टीस्टेटची 650 कोटी रूपयापर्यंत उलाढाल वाढली आहे. आपल्या परिसरातील लोकांसाठी काही तरी करण्याची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नाही. आज त्यांच्या उद्योगाचा विस्तार बीड, धाराशिव, लातूर या तीन जिल्ह्यात झाला आहे. रूपामाता मिल्कच्या उत्पादनाला राज्या बाहेर मागणी आहे. तर रूपामाता शुगरचे तीन युनिट कार्यान्वित आहेत. कोव्हीड काळात त्यांनी गोरगरीब, वंचित लोकांना अन्नदान करून एक प्रकारची मदतच केली.
सुधाकरराव गुंड गुरूजी यांच्याबरोबरच ॲड.व्यंकटराव गुंड यांनी राजकारणातही दबदबा कायम ठेवला. परिसरात भाजपाची ताकद नसताना सरपंच, जिल्हा परिषद सदस्य पद, पंचायत समिती सदस्य पद हे भाजप परिवारातीलच निवडून आणले. ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुलभा व्यंकटराव गुंड, मुलगी अंजली गुंड व मुलगा ॲड.अजित गुंड व त्यांच्या सौभाग्यवती ॲड.ऐश्वर्या गुंड उद्योग समूहाच्या व्यवस्थापनात जबाबदारी पार पाडत आहेत. आज गुंड कुटुंबात सात इंजिनियर व चार वकील आहेत. मातोश्री रूपाबाई विश्वनाथ गुंड यांचे सन 2003 मध्ये निधन झाल्यानंतर ॲड.व्यंकटराव गुंड यांनी रूपामाता उद्योग समूहाची मुहुर्तमेढ रोवली. ॲड.गुंड यांचा हा समूह आता या परिसरातील शेतकरी, बेरोजगारांसाठी आधारवड बनला आहे.