सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. मुंबई विभागातील 3, नागपूर विभागातील 1, पुणे विभागातील 3 आणि सोलापूर विभागातील 3 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दि. 16.1.2024 रोजी आयोजित कार्यक्रमात नोव्हेंबर ते डिसेंबर - 2023 या महिन्यात कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि 2000/- रोख पुरस्काराचा समावेश आहे. 

सोलापूर विभाग-पी.जे. जिजीमोन, स्थानक उपव्यवस्थापक, कलबुर्गी, सोलापूर विभाग, यांनी दि. 01.12.2023 रोजी कलबुर्गी स्थानकावरील शंटिंगच्या कामात, 07748 रिकामे रेक चालू स्थितीत शंट सिग्नल ओलांडताना दिसले. त्याने मोठ्याने ओरडून लोको पायलटला परिस्थितीची माहिती दिली आणि ट्रेन थांबवली, त्यामुळे रेक रुळावरून घसरण्यापासून वाचला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

सुनील कुमार, पॉइंट्समन, सावलगी, सोलापूर विभाग दि. 09.12.2023 रोजी सिग्नल्सची देवाणघेवाण करताना, अप ट्रेन क्रंमाक 60302 च्या आठव्या डब्यात गरम एक्सल दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याचा सिग्नल दाखवला आणि ट्रेन थांबवली व अग्नीरोधकाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. ट्रेन पुन्हा स्थानकावर पाठवण्यात आली आणि तो डब्बा वेगळा करण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

विनोद कुमार, गेटमन कलबुर्गी, सोलापूर विभाग, दि. 20.12.2023 रोजी यांना मालगाडीच्या ब्रेक व्हॅनच्या बाजूने विसाव्या वॅगनमध्ये गरम एक्सल दिसला. त्यांनी तात्काळ स्थानक व्यवस्थापक, कलबुर्गी यांना माहिती दिली. कलबुर्गी येथे ही वॅगन रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.  यावेळी मध्य रेल्वेचे श्री चित्तरंजन स्वैन, अतिरिक्त महाव्यवस्थापक, श्री एस एस गुप्ता, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, श्री सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, श्री एम एस उप्पल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आणि श्री एस एस केडिया, मुख्य ट्रॅक अभियंता, उपस्थित होते. 


 
Top