उमरगा (प्रतिनिधी)-प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने उमरगा-लोहारा परिसरात वाचनालये चालवणे, वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवणे यासह उमरगा-लोहारा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, शेती, कला, क्रिडा, साहित्य, पत्रकारिता, सहकार आणि ग्रंथालय या क्षेत्रात काम करणाऱ्या गुणीरत्नांचा प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्याचे काम केले जाते. हे पुरस्कार वितरणाचे पाचवे वर्ष आहे. 

यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ओझर-नाशिक येथे 'पुस्तकांचं हॉटेल' चालवणाऱ्या भीमाबाई जोंधळे या 75 वर्षीय आजी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. चंद्रकांत महाजन यांना जीवन गौरव, माधवराव पाटील यांना समाजरत्न, जाफर जमादार यांना पत्रकाररत्न, नानाराव भोसले यांना सहकाररत्न, श्रीराम पोतदार यांना संगीतरत्न, मंकावती कांबळे यांना शिक्षकरत्न, अनिल मदनसुरे यांना क्रिडारत्न, बालाजी गायकवाड यांना उद्योगरत्न, चंदाराणी घोरपडे यांना ग्रंथसेवा, राहुल सरडा यांना कृषीरत्न तर शाम हिप्परगे यांना उत्कृष्ट वाचक म्हणून गौरवण्यात येणार आहे. 

पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व क्षेत्रातले आणि सर्व पक्षातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा शनिवार दि.30 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता ओम साई मंगल कार्यालय, जुने गणेश चित्रमंदिर, मेन रोड, उमरगा येथे आयोजित केला आहे. 

'पुस्तकांचे हॉटेल' चालवणाऱ्या आजीबाईंना ऐकण्यासाठी आणि उमरगा-लोहारा परिसरातील गुणीरत्नांचा गौरव करण्यासाठी या सोहळ्यास परिसरातील सर्व नागरिकांनी, अबालवृद्धांनी यावे असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top