धाराशिव (प्रतिनिधी)- अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे लोकार्पणानिमित्त आयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून अक्षता कलश शोभायात्रा 30 डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता काढली जाणार आहे. या शोभयात्रेचे उद्घाटन कार सेवकांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची तसेच कलश रथाची पूजा करून होणार आहे. आकर्षक असा हा रामरथ फुलांनी सजवून धर्नुधारी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि अयोध्येहून आलेल्या कलशाची प्रतिष्ठापना  करून ही शोभायात्रा सुरू होत आहे.

या शोभा यात्रेचा मार्ग धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅन्ड जवळील श्री अनंतदास महाराज मंदिर येथून सुरू होणार असून त्यानंतर जिजामाता उद्यान, भिसे चौक, नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारुती चौक, श्रीसंत गाडगे बाबा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, सेंट्रल बिल्डिंग, स्वामी समर्थ मंदिर काकडे प्लॉट असा असणार आहे. या शोभा यात्रेचे धाराशिव शहरातील प्रत्येक चौकात भव्य स्वागत केले जाणार आहे.

आयोध्याहून आलेल्या या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर निर्माण अक्षता कलशाच्या  रथयात्रेच्या स्वागतासाठी शहरातील नागरिकांनी आपापल्या भागात दर्शनासाठी  पारंपारिक वेशभूषा धारण करून आपल्या आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून तसेच रथयात्रेवर पुष्पवृष्टी करून या रथाचे स्वागत करावे. राममय अंत:करणाने या अक्षता रथयात्रेत सहभागी व्हावे. तसेच हिंदू संस्कृतीचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.


 
Top