उमरगा (प्रतिनिधी)-मराठयांना सगरगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे उमरगा येथील सभेची तयारी युध्द पातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागातील 18 पगड समाजही जरांगे पाटील यांचे स्वागतासाठी व आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सरसावला आहे. जरांगे पाटील यांचे आगमनानंतर 101 जेसीबीतून पुष्पवृष्टी झाल्यानंतर माळी व धनगर समाजबांधव बेलभंडा-याची उधळण करत ढोलाच्या तालावर मनोज जरांगे पाटील त्यांचे स्वागत करुन आरक्षणाला पाठिंबा देणार आहेत. विविध समाजाच्या वतीने सभेला येणाऱ्या मराठा बांधवांना पाणी, चहा, नाष्टा व जेवण देण्याची तयारी सुरू आहे. 

मराठा समाजाला सगसगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्यांच्या राज्यव्यापी चौथ्या दौऱ्याला 1 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात त्यांची उमरगा येथील सभेच्या पूर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय परीसरातील कै. शिवाजीराव दाजी मोरे क्रिडा संकुलात रविवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. जरांगे पाटील यांचे हुतात्मा स्मारकासमोर फटाक्यांची आतिषबाजीसह 101 जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात येणार आहे. तर शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात माळी व धनगर समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील 18 पगड समाज ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. मराठा आलक्षणाला सर्वच स्तरातून पाठिंबा दिला जात आहे. सभेसाठी येणाऱ्यांना मुस्लीम व मातंग समाज बांधवांकडून पाणीवाटप करण्यात येणार आहे. 


सभास्थळी 20 बाय 42 चे भव्य व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 40 फुटाचा अश्वारूढ पुतळा, जरांगे पाटील यांचे स्पीचसाठी 150 फुटाचा रँप, 7 एल ई डी स्क्रीन, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची स्वतंत्र बैठक व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी दोन ॲंब्यूलन्स, 2 डॉक्टरांची पथके व तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


 
Top