धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानुसार धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे पारधी पिढीवर छापा मारला असता विधी संघर्षग्रस्त बालकाजवळ गावठी कट्टा सापडला आहे. पोलिसांनी पंचासमक्ष गावठी कट्टा जप्त करून ढोकी पोलिस स्टेशन येथे गावठी कट्ट्यासह बालकास ताब्यात देण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की तेरणा साखर कारखाना ढोकी समोरील पारधी पेढी येथे एक ईसमाकडे अवैध गावठी कट्टा आहे.अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथक दि. 09.05.2025 रोजी सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक विधी संघर्ष ग्रस्त बालक मिळून आला. त्याचे कडे गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गावठी कट्टा त्याचे घरामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती दिली. दोन पंचासह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याने एका लाकडी कपाटातील गावठी कट्टा पोलीस  समक्ष हजर केला. पोलिसांनी पंचनामा करून  15 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. सदर विधी संघर्ष ग्रस्त बालकास जप्त गावठी कठ्ठ्यासह पोलिस स्टेशन ढोकी येथे पुढील कारवाईस्तव ताब्यात दिले आहे. 

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक, शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशान्वये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण चालक पोकॉ भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 
Top