उमरगा (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्यासाठी सातत्याने निवेदन देवूनही महाराष्ट्र शासन या मागण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार दि.19 डिसेंबर घेण्यात आला आहे.
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी एकत्रित येऊन हा लढा उभा केला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे,ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचा अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समिती अहवालातील शिफारसी-ची अंमलबजावणी करणे,ग्रामसेवक पदाची सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवी करणे,विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे, ग्रामसेवक यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करणे, शिक्षकांप्रमाणे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व मिळणे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने आंदोलन करण्याचे ठरले असून सरपंच,उपसरपंच भत्त्यामध्ये भरीव वाढ व्हावी, ग्रांप सदस्यांना भत्ता मिळावा, ग्रापं कर्मचाऱ्यांना यावलकर समितीची शिफारस स्वीकारून वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
