उमरगा (प्रतिनिधी)- शिक्षकांनी स्वतःला प्रभावीपणे सादर करण्यासाठी आवाज आणि देहबोली या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपला आवाजही एक महत्त्वाची ओळख असल्याने आवाजाकडे आणि स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष दिल्यास बदल घडू शकतो. शरीराप्रमाणे आवाज जपण्यासाठी स्वरयंत्राचे व्यायाम नियमित करावेत. आवाजाची पातळी, आवाज थकणे, आवाज बसणे, स्पष्टता ही आवाजापुढील आव्हाने असतात. व्यसने, अपुरी झोप आणि बाहेरच्या खाण्यामुळे आवाजाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींबाबत दक्ष राहून, स्वरयंत्रासंबंधी स्नायूची ताकद वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण जसे डोळे हे आत्म्याचा आरसा आहेत तसा आवाज हा लाऊडस्पिकर आहे असे प्रतिपादन व्हाइस थेरपिस्ट डॉ. सोनाली लोहार यांनी केले.
उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील प्राध्यापकांसाठी “आवाजाची कार्यशाळा प्राध्यापकांसाठी“ संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे येथील व्हाइस थेरपिस्ट डॉ. लोहार बोलत होत्या. फुप्पुस आणि स्वरयंत्र आवाजासाठी महत्वाचे घटक असल्यामुळे त्यावर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यशाळेचे उद्घाटन करिअर कट्टाचे राज्य प्रमुख मा. यशवंत शितोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य दिलीप कुलकर्णी, गुंजोटी आणि प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, ढोकी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी यशवंत शितोळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य घनश्याम जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात शिक्षकांसाठी आवाज ही महत्त्वाची बाब असल्यामुळे त्यासंबंधित अवयव निरोगी ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सू्त्रसंचलन करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. एस. पी. पसरकल्ले व प्रास्ताविक डॉ. अर्जुन कटके यांनी केले. तर डॉ. विनोद देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याकार्यशाळेसाठी 150 हून अधिक प्राध्यापक आणि करिअर कट्टाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक , उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, डॉ. विनोद देवकर, डॉ. व्यंकट सुर्यवंशी, डॉ अजित अष्टे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पुढाकार घेतला.