धाराशिव (प्रतिनिधी)-वाळू वाहतूक करू देण्यासाठी 8 हजाराचा लाच घेताना कळंब येथील तहसीलदार यांच्या ड्रायव्हरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करतात. यातील आरोपी लोकसेवक अनिल सुरवसे हे कळंब तहसीलदार यांच्या वाहनावर वाहनचालक असून, त्यांनी तक्रारदार यांना वाळू वाहतूक करू देण्यासाठी व वाळूच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणून 15 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 8 हजार रूपये लाच रक्कमेची मागणी केली. लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यानंतर लाचखोर चालकास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपाधिक्षक सिध्दराम म्हेत्रे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलिस अंमलदार दिनकर उगलमुंगळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होतो.
