धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगर परिषदेत झालेल्या विविध कामात 27 कोटी रूपये घोटाळ्याची तपास विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत केला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी मंडळ सभागृहात केली.
धाराशिव नगर परिषदेतील कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आवाजव उठवला होता. धाराशिव नगर परिषदेतील घोटाळ्याबाबत काही प्रश्न आमदार धस यांनी उपस्थित केले होते. त्याला दिशाभूल व चुकीचे उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करीत आमदार धस यांनी अक्षेप घेतला होता. कामाच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार दिली होती. याबाबत आमदार धस यांनी तांराकित प्रश्न विचारल्यानंतर चार महिन्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे व इतर आरोपी गेल्या काही महिन्यापासून जेलमध्ये आहेत. विद्यमान मुख्याधिकारी यांनी कामात सुधारणा करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तीच वाटचाल कायम ठेवली असा आरोप आमदार धस यांनी विधीमंडळात केला. 542 प्रमाणके पैकी 242 प्रमाणके गहाळ आहेत. तर तब्बल 138 बँक खाती वेगवेगळ्या नावे काढली गेली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे झालेली नाहीत. तरी बिले काढली आहेत. घरकुल, आण्णाभाऊ साठे, रमाई योजनेचे पैसे नगर परिषदत फंडात वर्ग केले गेले आहेत.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना या घोटाळ्यात मोजमाप पुस्तिका गहाळ करणे, निधी वर्ग करणे यासह अन्य बाबतीत वस्तुस्थिती असल्याचे मान्य करीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले.
