धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा शहरातील अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखा पथकाने धाड टाकून 5 हजार किलो गोवंश जातीचे मांस, 50 जर्सी गायीचे वासरे, 6 वाहने व इतर साहित्य असा एकूण 42 लाख रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हेशाखेचे पथक व पोलीस मुख्यालय येथील जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने दि. 20 12.2023 रोजी अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.
सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी जाकीर हुसेन गुलाम गणी वय 60 वर्षे, रा. शेख मोहल्ला इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, आशपाक सादीर वेपारी, वय 30 वर्षे, रा. कासार पट्टा इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, असे मिळून आले. त्यांचेकडे अवैध कत्तलखाना चालवणारा मालकाविषयी चौकशी केली असता सदरचा कत्तलखाना फाजील इस्माईल सौदागर, रा. परंडा, ऐराब वाहिद सौदागर, ओवेस वाहिद सौदागर दोघे रा. सिकलगर गल्ली परंडा याचा असुन तो विनापरवाना असल्याचे सागिंतले.
42 लाख रूपयांचा माल जप्त
सदर छापा कारवाई दरम्यान कत्तलखान्यामध्ये 5 हजार किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस असे एकुण 10 लाख रूपये किंमतीचे मिळाले. तर 9 गोवंशीय जातीचे जर्सी गाय, 1 बैल व 40 जर्सी गायीचे वासरे किमंत अंदाजे 2 लाख 70 हजार रूपये, आयशर कंपनीच्या टेम्पो एमएच 45- 1389, चार पिकअप एमएच 45 टी 2150, एमएच 11 ए.जी. 9470, एमएच 08 ए.पी. 1420, एमएच 11 टी 5998 या पिकअप व टेम्पोमध्ये देखील मांस वाहतुकीसाठी वापरलेले, लोखंडी सत्तुर, सुरी, लोखंडी टांगता वजन काटा, तसेच 29 पत्रयाचे डब्बे, पाण्याची मोटर असा एकुण 42 लाख 05 हजार रूपये किंमतीचा माल नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
40 जर्सी गायची वासरे गोशाळेत रवाना
सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगर परिषद परंडा यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश करण्यात आला आहे. व जीवंत 9 जर्सी गाय, एक बैल, 40 जर्सी गायची वासरे अशी जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक ओहोळ, सपोफौ काझी, पोलीस हावलदार जानराव, निंबाळकर, पोलीस नाईक जाधवर, पोलीस अमंलदार कोळी, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.