धाराशिव (प्रतिनिधी)-गोवंशाच्या कत्तलीवर पुर्णपणे बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशाची तस्करी केली जाते. याला आळा घालण्यासाठी परंडा पोलिसांनी त्यांची गोपनिय यंत्रणा सक्रिय केली होती. दि. 30 डिसेंबर 2023 रोजी परंडा पोलिसांना गोवशांची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुध्द मोठे यश मिळाले आहे. 

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परंडा पोलिसांनी वारदवाडी फाटा परंडा येथे सापळा लावुन एक पिकअप जीप पकडले. त्यामध्ये एकुण 26 गोवंशीय जातीचे वासरे मिळून आली. सदरील वासरे अत्यंत कोवळी असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहचवणे आवश्यक असल्याने जागेवरच पंचनामा केला. पशु वैद्यकिय अधिकारी यांना घटनास्थळावर बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन भगवंत बहुउद्देशीय संस्था हाडोंग्री ता. भुम जि. धाराशिव येथे गो शाळेमध्ये सोडण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईने जणु या लहान वासरांना नवीन आयुष्य लाभले आहे. या कारवाईतुन पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यामध्ये गुंतलेल्या लोकांना इशारा दिलेला आहे. जर कोणी अशा प्रकाराची अवैध कृती करत असले तर त्यांच्याविरुध्द कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या अपराधांमध्ये वापरल्या जाणारे वाहने ही जप्त केली जातील आणि त्या वाहनाबाबत संबंधित आरटीओ यांना कळवून कारवाई करण्यात येणार आहे. सदर रेड मध्ये एकुण 7 लाख 30 हजार  रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात पोलिस नाईक एन. पी. गुंडाळे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुरनं 288/2023 कलम मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 192(अ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(डी)(ई)(एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ)(1), 9 (बी) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 6 प्रमाणे गुन्हा नोदंवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी,  उपविभाग भूम गौरप्रसाद हिरेमठ, परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इज्जपवार, सहा. पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार अर्चना भोसले, पोलीस नाईक नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार योगेश यादव, भुजंग, आडसुळ, चालक सचिन लेकुरवाळे यांच्या पथकांनी केली आहे.


 
Top