धाराशिव (प्रतिनिधी)-सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या माध्यमातून विकसित भारताचा संकल्प साकरण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेगाने कार्यरत असून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सरकार काम करत असून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय देखील लवकरच मार्गी लागेल असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी समुद्रवाणी ता. धाराशिव येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले.

समुद्रवाणी-येवती रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची सुधारणा करण्यात आली नसल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आज या रस्त्याच्या रु. 16 कोटीच्या कामाचे भुमीपूजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यासह गावांतर्गत सिमेंट रस्ता व विठ्ठल बिरुदेव मंदिर सभागृहाच्या कामाचे देखील उद्घाटन करण्यात आले. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या निधीमधून 9 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून समुद्रवाणी गावात सिमेंट कॉक्रीट रस्ता व पूल करण्यात येणार आहे. सदरील रस्त्याचे काम वेळेत व गुणवत्ता पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

यावेळी बोलताना आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभरात दर्जेदार रस्त्याचे जाळे निर्माण करत आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात देखील महामार्गाचे जाळे निर्माण होत असून आगामी काळात सुरत  चैनई, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. 2021 च्या पीक विम्याचे रु. 375 कोटी शेतकऱ्यांना मिळणे बाकी असून ठाकरे सरकारने याबाबत बैठक न लावल्यामुळे आपल्याला कोर्टात जायची वेळ आली. पीक विमा हा आपल्या हक्काचा विषय आहे, त्यासाठी आपण लढा देणार आहोत, व यात शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली असून याचा मोठा लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. महायुती सरकार मराठा समाजाला कायम स्वरूपी टिकणारे आरक्षण देणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय देखील लवकरच मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सदरील कार्यक्रमास भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, युवराज ढोबळे, ज्ञानेश्वर जंगाले, शिवाजी पसारे, बाजार समितीचे माजी सभापती तानाजी गायकवाड, सरपंच मीराताई हनुमंते, दत्ताभाऊ सोनटक्के, बाळासाहेब खांडेकर, महादेव महाराज साळुंखे, नागनाथ आप्पा पवार, गुरुलिंग स्वामी, नीलकंठ पाटील, दिनेश देशमुख, दयानंद शिंदे, रामभाऊ गव्हाणे, डॉ. निशा पत्तेवार, अमीर पठाण, कार्यकारी अभियंता चव्हाण, ग्रामसेवक शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


 
Top