धाराशिव (प्रतिनिधी)-परंडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत भूम तालुक्यातील ईडा येथे आरोपीने कुलूप लावून बंद ठेवलेल्या घरामधील गांजाचा शोध लावला. त्यानंतर आरोपींचे नातेवाईक व महसूल विभागाचे प्रतिनिधी बोलवून शासकीय पंचासमक्ष घराव छापा टाकत घरातील 12 लाख 80 हजार 490 रूपयांचा गांजा जप्त केला. घरात राहणाऱ्या पाचही लोकांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ईडा तालुका भूम येथे संतोष संजय जाधव यांच्या कुलूप लावलेल्या घरी मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. परंड्यापासून 25 किमी अंतरावर अत्यंत दुर्गभ भागात हे गाव असल्यामुळे याचा फायदा आरोपी संतोष जाधव याने घेतला होता. गांजा विक्रीचा व्यवसाय करून तरूण पिढीला नशेच्या खाईत ढकलत होता. परंतु परंडा पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस हवलदार दिलीप पवार, पोलिस नाईक काकडे, पोलिस नाईक गुंडाळे, पोलिस कॉस्टेबल योगेश यादव, कोळेकर, आडसुळ, चालक सचिन लेकुरवाले आणि सरगर यांच्या पथकाने पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधिक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. या प्रकरणी कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करत आहेत. 


 
Top