धाराशिव (प्रतिनिधी)-राज्याचे सध्याचे कर्तबगार लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी देवीचा अभिषेक घातला व अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा आशीर्वाद मिळावा यासाठी जिल्हाध्यक्ष व नेरूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सागर संजय पवार, हनुमंत पवार व त्यांचे इतर 6 सहकारी नेरूळ (मुंबई) येथून पायी चालत आले होते. ही पदयात्रा 15 नोव्हेंबरला  सुरू होऊन ती दि. 28 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे म्हणाले की, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद नक्कीच दादांना मिळेल व ते मुख्यमंत्री होतील. यासाठी माझ्यासह  पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांनी गोरगरिबांची सेवा करून  राष्ट्रवादीचे अजित दादा यांच्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. दादा हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होऊन जनतेच्या सेवेसाठी तयार असतात. पक्षाला बहुमत मिळण्यासाठी 145 चा आकडा पार करावा लागणार आहे व ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी यांच्या प्रयत्नातून करावा लागणार आहे. याच पद्धतीने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांनी काम करावे, असे काम केल्याने देवी चा आशीर्वाद नक्कीच दादांना मिळेल अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिवच्या वतीने नेरूळ वरून आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर, तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन आबा रोचकरी, नेरूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



 
Top