नळदुर्ग (प्रतिनिधी)- पाच महिन्याचा कालावधी उलटुनही शहर विकासाची कामे पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी तसेच शहरातील डुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी दि.9 नोव्हेंबर पासुन नळदुर्ग शहर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने न.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.

नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी न.प.च्या वतीने विविध फंडातुन 7 कोटी 30 लाख रुपये खर्च करून शहरांतील विविध भागांमध्ये सिमेंट रस्ते, गटारी, सभागृह, व्यायाम शाळा बांधणे, संरक्षक भिंतीचे काम, गार्डन विकसित करणे यासह विविध कामे करण्यात येणार होते. या कामाचा ठेका उमरगा येथील पारस कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाला आहे. पारस कन्स्ट्रक्शनला नगरपालिकेने कार्यारंभ आदेश देऊन पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही अनेक कामे पुर्ण झाली नाहीत. त्यामुळे न.प.प्रशासनाने ठेकेदाराच्या विरोधात कठोर पाऊले उचलुन न सुरू झालेली कामे रद्द करून नव्याने निविदा प्रक्रीया राबवावी व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शहरांतील डुकरांचा बंदोबस्त करून शहर डुक्कर मुक्त करावे या मागणीसाठी दि.9 रोजी बीआरएसचे जिल्हा मिडीया समन्वयक सुनिल गव्हाणे, बीआरएस पक्षाचे शहर अध्यक्ष अजहर शेख व सय्यद रशिद जागिरदार हे न.प.कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी अनेक माजी नगरसेवक व शहरांतील विविध संघटनांनी उपोषणस्थळी जाऊन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.


 
Top