तेर (प्रतिनिधी)-“पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दी संगीत महोत्सव,“ ही पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांना वाहिलेली आदरांजली असून या महान संगीतरत्नाच्या जन्मगावी तेर आणि धाराशिव येथे दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान साजरी करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील दिग्गजाचे जन्मशताब्दी पर्व आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने भारत भर कार्यक्रमांची रेलचेल राहील. पंडित जी हे आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेले प्रसिद्ध संगीतकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आणि कलाकारांच्या एक पिढया घडविणारे आदरणीय गुरू होते. 

या तीन दिवसीय महोत्सवात पंडित सी आर व्यास यांचे गौरवशाली जीवन आणि वारसा यातील विविध पैलूंचा समावेश असेल. दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी तेर येथील ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिरात अभंग रत्न श्री. गणेश कुमार यांच्या अभंगवाणी नामसंकिर्तनाने महोत्सवाची सुरुवात होईल. त्याच दिवशी संध्याकाळी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचे भजन गायनातील “चक्री भजन“ नावाचा एक अनन्य आणि दुर्मीळ प्रकार सादर करण्यात येईल.

या अध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या अनुभवांनंतर, महोत्सवात पंडितजींचे विद्यार्थी दिनांक 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रिय गुरूंना आदरांजली अर्पण करून शास्त्रीय संगीत सादर करतील. कसलेल्या कलाकारांच्या संगीत आराधनेसह नटलेल्या या मैफिलीचा शुभारंभ पंडित सी आर व्यास यांचे नातू आदित्य व्यास यांच्या सादरी करणाने होईल, तर पंडितजींचे सुपुत्र सुहास व्यास यांच्या प्रस्तुतीकरणाने समारोप करण्यात येईल. कार्यक्रमात त्यांचे द्वितीय सुपुत्र, जागतिक ख्यातीचे संतूरवादक सतीश व्यास, तसेच श्रीपाद पराडकर, श्रीराम शिंत्रे, संजीव चिम्मलगी, श्याम गुंडावार, शोभा चौधरी, शुभांगी जोशी, संगीता आचार्य, श्रीपती हेगडे, गणपती भट, अपर्णा केळकर, आणि व्हायोलिनवर श्रीराम परशुराम यांसारखे अनेक दिग्गज विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

या मैफिलीचे चे सहकलाकार ज्यांच्या सहभागामुळे मैफिलीची रंगत अधिकच बहारदार होईल, यामध्ये व्हायोलिनवर डॉ. एम. नर्मदा, पैयन्नुर, रोहित प्रसाद, परितोष, तबल्यावर महेश कानोले, मुकुंदराज देव, कौशिक केळकर आणि हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, अभिषेक काठे, सिद्धार्थ कर्वे हे गुणीजन सुरावटींचे रंग भरतील. या लक्षवेधी सोहळ्याची प्रस्तुती महाराष्ट्र ललित कला निधी, कलावर्धिनी आणि ग्रेस फाऊंडेशन करणार असून या माध्यमातून दिव्य सांगीतिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. तीन दिवस सुरू असणारा हा सोहळा सर्व संगीत रसिकांकरिता खुला राहील आणि प्रवेश मोफत आहे. 


 
Top