तुळजापूर (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक पारदर्शी आणि गतिमान व्हावा, यासाठी शासनाने जनतेतून निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधी पालिकेत पाठविले. दर पाच वर्षांनी निवडणूक घेण्यामागचा मुख्य हेतू सत्तेचे विकेंद्रीकरण होता. मात्र डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका दोन वर्षे उलटत असतानाही जाहीर झाल्या नाही. प्रशासक राजचा  विकास कामांवर परिणाम होत आहे. तालुक्यातील दोन पालिकांवर 'प्रशासकराज' कायम आहे. निवडणुकीचा बिगुल कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहराच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका अशा महत्त्वाची दुवा मानली जाते. तालुक्यात तुळजापूर व नळदुर्ग, या दोन नगरपालिका

आहेत. त्यापैकी तुळजापूर भाजप तर नळदुर्ग राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी पवार गटाच्या ताब्यात होत्या. नगरपालिकांतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर ते डिसेंबर 2021 दरम्यानच संपला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार राज्यात विराजमान होते. कोरोना, पावसाळा आदी कारणांमुळे निवडणूक वेळेत घेणे शक्य नसल्याने पालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले. जिल्ह्यातील पालिकांवर कुठे मुख्याधिकारी तर कुठे उपविभागीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत. प्रशासक नेमलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक किमान सहा महिन्यात होणे अपेक्षित आहे. मात्र प्रभाग रचना, वॉर्ड फॉरमेशन,

आरक्षण आदी प्रक्रिया पूर्ण होऊनही निवडणुका जाहीर झाल्या नाही. पालिकांच्या निवडणुका जाहीर होत नसतानाच राज्यात जून-जुलै दरम्यान मोठा राजकीय भुकंप झाला. सेनेत मोठी बंडखोरी होऊन महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नवे सरकार स्थापन होऊन सव्वा वर्षांचा कालावधी होतआला आहे. मात्र अद्यापही पालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही. नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द केला. भाजपा-सेना युती सरकारचा जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय पुन्हा लागू केला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका दोन वर्ष लोटत

असतानाही जाहीर केल्या नाही.


लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी!!

देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला प्रारुप मतदार यादी, नव मतदारांची नावे समाविष्ठ करणे, आक्षेप, हरकती मागविणे, अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाला पाठविण्याबाबत आदेश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले. त्यानंतर प्रशासनही कामाला लागले आहे. लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाईल, असे बोलले जात आहे. एकूणच लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला प्रशासन लागले असताना नगरपालिका निवडणुकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


इच्छुकांचीही धावपळ थंडावली

पालिकांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या प्रभागांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र वर्षे उलटत असतानाही पालिकांमध्ये प्रशासकराज कायम असल्याने इच्छुकांचीही धावपळ थंडावल्याचे दिसत आहे.


 
Top