धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आर्चरी (तिरंदाजी) या स्पर्धेचे अंतर विभागीय स्तरावर आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये वर्धा , अमरावती, सांगली , जळगाव ,बार्शी ,सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी सोलापूर झोनचे सचिव शिवशरण कोरे., जळगावचे प्रा. महाजन, लांडगे तसेच स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा. रफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती .

विविध विभागातून आलेल्या या खेळाडूंनी आपले उत्कृष्ट असे कौशल्य यामध्ये दाखवून खेळाचा आनंद घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माने म्हणाले की, अर्चरी खेळाचे महत्व हे अनेक वर्षांपासून असून भविष्यात उत्तम खेळाडू तयार व्हावेत म्हणून विद्यापीठाने अत्यंत चांगला उपक्रम राबविलेला आहे. जो विद्यार्थी खेळामध्ये तंत्र अवगत करतो त्या मध्ये पारंगत होतो तो त्याच्या आयुष्यात निश्चितपणे यश मिळवितो. या स्पर्धेच्या वेळी शहरावर सकाळपासून अवकाळी पावसाचे सावट असतानाही जिल्ह्यातील एकमेव तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुसज्ज अशा आर्टिफिशियल लॉनवर (कृत्रिम) मोठा पाऊस होऊनही विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेता आला .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण होते.

यावेळी लांडगे सरांनी आर्चरी या खेळाचे महत्व आणि या खेळासाठी असलेले नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. लवकरच विद्यापीठाकडून या स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल.


 
Top