नळदुर्ग (प्रतिनिधी)- सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम  सुरू होऊन 10 वर्षाचा कालावधी उलटुन गेला तरी अद्याप या महामार्गाचे काम पुर्ण झाले नाही. सध्याचा जो जुना महामार्ग आहे त्यावरूनच वाहतुक सुरू आहे. मात्र हा महामार्ग प्रवाशी तसेच वाहन चालकांसाठी सध्या धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. महामार्गाचे काम पुर्ण होण्याच्या फक्त तरखावर तरखाच जाहीर होत आहेत. आजही नळदुर्ग, अणदुर परीसरात महामार्गाचे काम अतीशय संथगतीने सुरू आहे. कामाची हीच परीस्थिती राहिली तर आणखी दहा वर्षातही हे काम पुर्ण होणार नाही. 

सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दहा वर्षापुर्वी म्हणजे 2013 साली सुरू झाले होते. आज 2023 हे वर्ष संपत आले तरी हे काम पुर्ण झाले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 13 वर्षात पुर्ण का झाले नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत अनेक ठेकेदार  आले आणि काम सोडुन पळुन. काम अर्ध्यावर टाकुन ठेकेदार का पळाले याचीही चौकशी होण्याची आज गरज आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासुन रखडत पडलेले असताना याकडे लोकप्रतिनिधींचेही मोठे दुर्लक्ष झाले आहे.वास्तविक पाहता सर्वच लोकप्रतिनिधीनी या महामार्गाचे काम वेळेत पुर्ण करून घेणे अपेक्षित होते मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही.लोकप्रतिनिधी बरोबरच प्रशासनाचेही या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. अनेकदा जिल्हाधिकारी यांच्यासोबत या कामासंदर्भात बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये काम पुर्ण करून घेण्याच्या तारखा जाहीर झाल्या मात्र त्या तारखा फक्त कागदावरच राहिल्या आहेत. आजही या महामार्गाचे काम अर्ध्यावरच रखडत पडले आहे. कुठेतरी अतीशय संथगतीने हे काम सुरू आहे. मध्यंतरी कांही महिन्यांपुर्वी या कामाला थोडी गती मिळाली होती. मात्र ती अल्पच ठरली. वास्तविक पाहता या कामाला कुणाचाच विरोध किंवा अडथळा नाही तरीही हे काम अद्याप पुर्ण का होऊ शकले नाही? 

महामार्गाचे काम पुर्ण झालेले नसतांना या महामार्गावर धनगरवाडी आणि तलमोड याठिकाणी टोलनाके उभे करून टोल वसुली केली जात आहे. ही टोल वसुली नियमानुसार सुरू आहे का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. कांही महिन्यांपुर्वी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी या दोन टोलनाक्यावर आंदोलन करून या टोल नाक्यावरील टोल वसुली बंद पाडली होती. मात्र त्यानंतर पुन्हा हे टोल नाके सुरू झाले असुन या दोन्ही टोल नाक्यावर टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. महामार्गाचे काम तर आजही पुर्ण झाले नाही मग टोल वसुली पुन्हा का सुरू करण्यात आली? 

सोलापुर महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली करणाऱ्या एसटीपीएल कंपनीला निलंबीत करून महामार्गाचे काम त्रिवेणी मदुराई या कंपनीला दिले आहे आणि टोल वसुली प्राधिकरणाकडे घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची स्थिती आजही तशीच आहे.त्यामध्ये थोडी फार सुधारणा झाली असली तरी आद्यपही महामार्गाचे काम अर्ध्यावरच रखडत पडले आहे. या महामार्गावरील लहान, मोठे पुल तसेच उड्डाण पुलाचे काम अजुनही पुर्ण झाले नाही.नळदुर्ग बायपास रस्त्याचे कामही गेल्या अनेक वर्षांपासुन रखडत पडले आहे. हे काम सध्या सुरू असले तरी अतीशय संथ गतीने सुरू आहे.

महामार्गाच्या कामात कुठलाच अडथळा नसताना हे काम का पुर्ण होत नाही. हे काम ज्या ठेकेदारांनी घेतले होते त्यातील अनेक ठेकेदार काम अर्ध्यावरच सोडुन का पळुन गेले याची वरीष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. हा महामार्ग अतीशय महत्वाचा महामार्ग आहे. कारण या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये, जा सुरू असते. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकर पुर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे. कारण सध्याचा जुना महामार्ग हा अतीशय धोकादायक व जीवघेणा बनला आहे.


 
Top