नळदुर्ग (प्रतिनिधी) -शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटूंबियाच्या घर जागेची नोद नगरपरीषदेच्या दप्तरी घेऊन प्रधानमंञी आवास योजना, रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा या करिता 16 नोव्हेंबर पासुन नगरपरीषद कार्यालयसमोर वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, बौध्दनगर,भिमनगर,डॉ आंबेडकर नगर येथील सुमारे 70 जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
नळदुर्ग शहरातील वरील भागातील नागरीक गेल्या पाच दशकापुर्वीपासुन शासकीय जागेवर कब्जे वहिवटीनुसार राहत आहेत या कुटूंबाच्या घरजागेची नगरपरीषद कार्यालयात नोंद करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावे नागरिक अनेक वर्षापासुन प्रशासनाचे उबंरठे झिजवित आहे. व या नागरीकांनी पुराव्यासह घर जागेचे भोगवाटदार म्हणुन नोंद करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा नगरपरिषद प्रशासन जागेची नोंद घेऊन 8 अ ची नक्क्ल देत नाही. त्याचबरोबर या विषयावर कसल्याच प्रकारचे पाऊल उचलत नाही. त्यामुळे लाभार्थी शासकीय योजनेपासुन वंचीत राहत आहेत. याविषयी संबंधित प्रशासनाला
अनेक वेळा मागणी अर्ज देऊनही प्रशासन याविषयी दुर्लक्ष करीत आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. नगरपरीषद समोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांशी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी चर्चा केली त्याचबरोबर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही दुरध्वनीवरून चर्चा केली व सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सायंकाळी 5 वा. तुळजापुरचे तहसिलदार अरविंद बोळनगे यांनीही उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रशासन यासंदर्भात सर्व ते काम करीत आहे त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे असे सांगितले.मात्र उपोषणकर्ते जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणावरून उठणार नाही असा निर्णय घेऊन उपोषण सुरूच ठेवले आहे.कल्पनाताई गायकवाड, दादासाहेब बनसोडे, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, माजी नगरसेविक छमाबाई राठोड, प्रकाश बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, सचिन राठोड, फुलचंद नाईक, सुभाष राठोड, शाम पवार, सुरेश राठोड, रवी राठोड, ज्ञानेश्वर वाघमारे, शशिकांत घोडके दत्ता राठोड, संजय राठोड हे अमरण उपोषणास बसले आहेत. यावेळी 200 पेक्षा जास्त नागरीक उपस्थित होते.