मुंबई (प्रतिनिधी)- मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आता राज्यातील आंदोलक, शासनकर्ते यांच्यासह लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले. त्याचबरोबर या आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मंत्रालयाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे. त्यामुळे यांना पोलिसांनी अटक केली.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी आमदारांकडून मंत्रालयाला टाळे लावण्यात आले आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी हे आमदार करत आहेत.
मंत्रालयाच्या परिसरात सध्या सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे. कैलास पाटील, राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने विशेष आधिवेशन बोलवावे अशी मागणी या आमदारांची आहे. यावेळी आंदोलन करणा-या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिला आरक्षणाकरिता संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले त्यावर तोडगा निघाला. त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचे अतितात्काळ अधिवेशन बोलवावे, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही मंत्रालयाला टाळे ठोकले.