धाराशिव (प्रतिनिधी)-क्षेत्राची पडताळणी करण्याच्या नावाखाली कंपनीने अद्यापही सुमारे 33 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पिकविमा वितरीत केला नाही. यामुळे नाराजी वाढत असून, पडताळणीसाठी नेमके आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला होतो. जिल्ह्यात अग्रिमसाठी सर्व 57 मंडळातील 4 लाख 98 हजार 720 शेतकरी पात्र ठरले. या सर्वांना 218 कोटी 85 लाख रूपये अग्रीम मंजूर करण्यात आला होतो. आतापर्यंत 4 लाख 65 हजार 71 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 205 कोटी 91 लाख रूपये जमा करण्यात आले असल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात येत आहे. विमा कंपनीकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. 7 हजार 53 शेतकऱ्यांची 25 टक्के रक्कम एक हजाराच्या आत असल्याने शासनाकडून 52 लाख 79 हजार दिले जाणार आहेत. मात्र उर्वरित शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असल्यामुळे पडताळणी करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सता हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पाच ते सहा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप विमा देण्यात आलेला नाही. पडताळणीच्या नावाखाली विलंब लावला जात आहे. विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम कधी मिळणार हे सांगण्यात आलेले नाही. यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिवाळीच्या अगोदर सर्वांना अग्रीम मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र दिवाळी संपून चार दिवस होत आले तरीही अग्रीम देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तातडीने यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. काही हजार शेतकरी राहिले तर विका कंपनी शक्यतो विम्याची रक्कम देत नसल्याचा अनूभव आहे.