धाराशिव (प्रतिनिधी)-समाजापासून वंचित असलेल्या पालावरील भटक्या मुलांसोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. या मुलांना आवडीचे कपडे, त्यांना हवे ते फटाके आणि त्यांच्यासोबत गाडीतून फेरफटका मारून फराळाचे वाटप करून दिवाळीचा आनंद घेतला.

सांजा बायपास रोड वर पालावर काही कुटुंबे वास्तव करत आहेत. या ठिकाणच्या मुलांना धाराशिव शहरात आणून आमदार पाटील यांनी मोठ्या आनंदात या सर्व मुलांशी गप्पा गोष्टी केल्या, आणि दिवाळीच्या आत्मिक आनंदोत्सवास सुरुवात झाली. शहरातील जवाहर ड्रेसेसमधून या सगळ्या मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे घेण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची उत्स्फूर्त मागणी या मुलांनी केल्यानंतर त्यांच्या सोबत जाऊन फटाक्यांच्या दुकानातून त्यांना जे हवे ते फटाके त्यांनी घेऊन दिले. आपल्या गाडीत या सर्व मुलांना घेऊन त्यांनी फेरफटकाही मारला. त्यानंतर त्यांनी  स्वतः या मुलांना त्यांच्या पालावरील घरी घेऊन गेले व त्यांच्या कुटुंबियांसमवेत फराळाचे वाटप केले. 

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने देखील आ राणाजगजितसिंह पाटील यांनी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे समाजातील गरजवंत घटकाला त्यातून सहकार्य लाभले. अगदी त्याच पद्धतीने दिवाळीच्या या आनंददायी पर्वाच्या निमित्ताने समाजातील वंचित, गरजू घटकांना आपापल्या परीने सर्वांनी जमेल ते सहकार्य करून आत्मीयतेची दिवाळी साजरी करावी असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

यावेळी युवा नेते मल्हार पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, राहुल काकडे, संदीप इंगळे, प्रवीण शिरसाट, राहुल शिंदे, मनोज देशमुख, गणेश एडके, सागर दंडनाईक, आदी उपस्थित होते.


 
Top