भूम (प्रतिनिधी)-तालुक्यात त्वरित चारा छावणी सुरू करा, दूध दरवाढ करा, पशुधनाचा चाराप्रश्न तत्काळ मार्गी लावा, अशा विविध मागण्यांसाठी गोलाई चौक येथे शेतकऱ्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. हे आंदोलन जवळपास एक तास चालल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर उपविभागीय अधिकारी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
भूम तालुक्यामध्ये पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अद्याप सरकारने तालुक्यात चारा छावणी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. दुधालाही योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवणे अवघड जात आहे. यावर्षी उत्पनामध्येही घट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. जास्त दर देऊन विकतचा चारा घेणे परवडत नसल्याने शासनाने त्वरित छावणी सुरु करून शेतकऱ्यांसह पशुधन वाचवावे अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केली. यावेळी पशुपालक बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गवळी, मधुकर लोंढे, राम गाढवे, राम वीर, चंदकांत बाराते यांच्या सह पशुपालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.