धाराशिव (प्रतिनिधी)-लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पावरील तेरणा उपसा सिंचन योजनेंतर्गत विविध कालवे व पाणी वितरण यंत्रणेची कामे करण्यात आली आहेत. मात्र ही योजना अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे योजनेत दुरूस्ती करून उपसा सिंचन योजनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 24 गावांच्या शेतीशिवाराला सिंचनाखाली आणावे, अशी मागणी निम्न तेरणा उपसा सिंचन योजना संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, निम्न तेरणा प्रकल्पावरील तेरणा उपसा सिंचन योजनेचे पाच पंपहाऊस उभारणी व त्या प्रकल्पाचे पाणी वितरण करण्यासाठी बांधलेले कालवे यासाठी मोठ्या रकमेची भांडवली गुंतवणूक झालेली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होऊन याचा वापर झालेला नाही. याचा परिणाम म्हणून एकूण 24 खेड्यांतील सात हजार हेक्टर शेती क्षेत्र दुष्काळाचा सामना करत आहे.

प्रत्येक वर्षी करजखेडा, पाटोदा, भंडारी, गोगाव, ककासपूर, तोरंबा, ताकविकी, बामणी, बामणीवाडी, बरमगाव, वडाळा, विठ्ठलवाडी, उमरेगव्हाण, पंचगव्हाण, महादेववाडी, नांदुर्गा, कनगरा, महाळंगी, केशेगाव, धुत्ता, कानेगाव, आरणी, उजनी आणि आशिव या गावांमध्ये टँकरसदृश्य परिस्थिती असून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. प्रामुख्याने ऊसक्षेत्र असलेला हा भाग आहे. केवळ पाणी नसल्यामुळे ऊसक्षेत्र धोक्यात आले आहे. या 24 गावांतून या योजनेचे कॅनल गेले आहे. योजनेत शासनाचे भांडवल पडून असून याच्या देखभालीचा खर्च पाहता, ही योजना चालू करणे हे टँकरमुक्ती आणि शेती उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी समृद्ध करणारी आहे. हा प्रकल्प दुरुस्त होऊन वापरात आल्यास या गावातील सर्व लाभार्थी शेतकरी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी वापर, देखभाल, दुरुस्ती आणि संरक्षण याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत.

मागील दोन वर्षे हक्काच्या पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने निम्न तेरणा उपसा सिंचन योजना संघर्ष समितीने वारंवार लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत; परंतु मागणीची अद्याप दखल घेण्यात आली नाही. सध्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून यासाठी सर्वसमावेशक संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. यावेळी मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीने या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर जगदीश पाटील, गणेश क्षीरसागर, अमर माने, किशोर पाटील, अरूण कोळगे, कालिदास गायकवाड, अभिजीत पाटील, दिनेश पाटील, नागनाथ बोरगावकर, सचिन सूर्यवंशी, सूरज इंगळे, प्रदीप पाटील, बाळासाहेब पाटील, शाहूराज मोटे, नागेंद्र पाटील, पांडूरंग घाडगे, सुजित पाटील, नेताजी गायकवाड, गुंडाप्पा गाजरे, बलभीम भोसले, आण्णासाहेब पाटील, धनराज पुरी, गौतम क्षीरसागर, भागवतसिंग बायस, मल्लिनाथ बनसोडे, शंकर बुर्ले आदींची स्वाक्षरी आहे. 


 
Top