धाराशिव (प्रतिनिधी) - नळदुर्ग नगर पालिकेच्या अंतर्गत शहरतील विविध विकास कामे करण्यासाठी 7 कोटी 30 लाख रुपयांचा ठेका ठेकेदाराला दिला होता. परंतू 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही ती कामे पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे दि.2 नोव्हेंबर रोजी केली आहे.दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध फंडातून 7 कोटी 30 लाख रुपये खर्च करून शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, गटारी, सभागृह व व्यायाम शाळा बांधणे, संरक्षक भिंतीचे काम, बगिचा विकसित करणे यासह विविध कामे करण्यात येणार होती. या कामांसाठी पारस कन्स्ट्रक्शन कंपनी उमरगा यांना कार्यारंभ आदेश देऊन साडेचार महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा अनेक विकास कामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ही विकास कामे उर्वरीत 1 महिन्यात होतील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या विरोधात कठोर पावले उचलून सुरू झालेली कामे रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच कामे न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात करण्यासाठी प्रयत्न करावे. तर कमी कालावधी उरल्यामुळे कंत्राटदाराकडून घाईगडबडीत कामे उरकण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावे.  मात्र रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दर्जाहीन कामे होवू शकतात आशा वेळी विशेष काळजी घेण्यासाठी नगर अभियंत्यास आदेशित करावे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पक्षाच्यावतीने नगर परिषदच्या समोर दि.9 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावर सुनील गळाणे, अहमद अली मिनियार, दिपक माळाळे, सुर्यकांत सुरवसे, शमशोद्दीन शेख, अनवर शेख, शेख अली शेख,  रशिद जहागीरदार, हाजी शेख, महेबुब मौजन व खालीद मौजन आदींच्या सह्या आहेत.


 
Top