धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान माजलगाव व बीडमध्ये आमदारांच्या घर, गाड्यासह इतर समाजातील लोकांचे हॉटेल, व्यापारी प्रतिष्ठान यांच्यावर दगडफेक करून जी जाळपोळ झाली त्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला आहे. त्यामुळे ओबीसी समाज संघटना रस्त्यावर उतरली आहे अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रविवार, दि.19 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस प्रा. टी. पी. मुंडे, चंद्रकांत बावकर, मच्छिद्र भोसले, आबा खोत, सचिन शेंडगे व इतर ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती देताना प्रकाश शेंडगे यांनी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट केले जात आहे. यातून मराठा व ओबीसी असा वाद पेटविला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात जे सकल मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले होते त्यामध्ये ओबीसी समाज देखील सहभागी झाला होतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे. अंबड येथे झालेली ओबीसी समाजाची सभा ही राजकारणाला कलाटणी देणारी सभा आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर सरकार खाली खेचण्याची ताकद आमच्यात असल्याचे या सभेने दाखवून दिले आहे. आता पुढील सभा हिंगोली येथे 26 तारखेला घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 


कुणबी आणि मराठा वेगळे

प्रकाश शेंडगे व कोकण विभागातील कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर यांनी कुणबी व मराठा समाज वेगवेगळा असल्याचे सांगून कोकणामध्ये शेताचे मालक असणारे मराठे आहेत. तर शेतामध्ये काम करणारे हे कुणबी आहेत. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कुळी मराठा आणि कुणबी यात फरक असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे सरकारने कुणबी समाजाचे पुरावे मिळविण्यासाठी पूर्ण प्रशासन कामाला लावले आहे. न्यायमुर्ती शिंदे समितीने पावणे दोन कोटी कागदपत्रे तपासल्यानंतर त्यामध्ये फक्त 11 हजार नोंदी सापडल्याचा दावाही शेंडगे यांनी केला. आता मात्र लाखावर कुणबी समाजाचे कागदपत्र सापडत आल्याचे सांगण्यात येत आहे. लाखो नोंदी सापडल्या तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला निश्चित धक्का लागणार असा दावाही शेंडगे यांनी केला. 10 ते 12 टक्के मराठा समाज

मराठा समाज 32 टक्के असल्याचे सांगत आहे. परंतु यात कुणबी समाजाचाही समावेश आहे. मराठा समाज व कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा समाजातून कुणबी समाज वेगळा केला तर मराठा समाजाची संख्या 10 ते 12 टक्के होते. त्यामुळे सरकारने आर्थिक निकषावर आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला दिला आहे. इ डब्ल्यु एस मध्ये 10 पैकी 8.50 टक्के आरक्षण मराठा समाजालाच आहे असेही शेंडगे यांनी सांगितले.


मास्टर माईन्ड का सापडत नाही

ओबीसी समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी व पोलिसांवरील विश्वास वाढविण्यासाठी बीडमधील जाळपोळीचा मास्टर माईन्ड याला पकडणे महत्वाचे आहे असे सांगून प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी समाज रस्त्यावर जरी उतरला असला तरी कोणावरही दगड ही मारला नाही. बीड मधील जाळपोळीच्या घटनेमुळे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात तातडीने पावले नाही उचलल्यास ओबीसी समाज पण आपल्या जीवाचे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळा मार्ग पत्करेल असा इशाराही शेंडगे यांनी दिला. 


 
Top